Breaking
ब्रेकिंग

विधानसभेच्‍या निवडणूकीत पुन्‍हा एकदा महायुतीचा झेंडा फडकविणारच असा आत्‍मविश्‍वास मुख्‍यमंत्री ना.एकनाथ शिंदे

0 0 2 7 7 8

विधानसभेच्‍या निवडणूकीत पुन्‍हा एकदा महायुतीचा झेंडा फडकविणारच असा आत्‍मविश्‍वास मुख्‍यमंत्री ना.एकनाथ शिंदे

लोणी (प्रतिनिधी) दि. 22 जून नाशिक शिक्षक पदवीधर मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ.किशोर दराडे यांच्‍या निवडणूक प्रचारार्थ लोणी येथे शिक्षक मतदार, संस्‍था चालक आणि महायुतीचे पदाधिकारी यांच्‍याशी मुख्‍यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. शिक्षकांचा आत्‍मसन्‍मान आणि मान वाढविण्‍यासाठी महायुतीचे सरकार कटिबध्‍द असल्‍याची ग्‍वाही त्‍यांनी दिली. शिक्षकांच्‍या प्रश्‍नांच्‍या सोडवणूकीसाठी महायुतीचे सरकार निश्चित प्रयत्‍न करणार असल्‍याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

याप्रसंगी पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील, माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, आ.राम शिंदे, आ.मोणिकाताई राजळे, डॉ.सुजय विखे पाटील, सदाशिव लोखंडे, जिल्‍हा बॅंकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ.राजेंद्र विखे पाटील, माजी आ.वैभव पिचड, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष दिलीप भालसिंग,विठ्ठलराव लंघे, शिवसेनेचे जिल्‍हाप्रमुख कमलाकर कोते, विनायक देशमुख, सुरेंद्र थोरात यांच्‍यासह जिल्‍ह्यातील संस्‍था चालक मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

आपल्‍या भाषणात मुख्‍यमंत्री ना.एकनाथ शिंदे म्‍हणाले की, लोकसभा निवडणूकीत विरोधकांनी उपस्थित केलेल्‍या खोट्या मुद्यांना खोडून काढण्‍यात आम्ही कमी पडलो. यातून बोध घेवून आम्‍हाला आता पुढे जायचे आहे. मोदी हटावचा नारा देणारे हटले परंतू देशाच्‍या पंतप्रधान पदावर तिस-यांदा नरेंद्र मोदीजीच विराजमान झाले याचा अभिमान सर्व देशवासियांना आहे. महाविकास आघाडीने कसा प्रचार केला या खोलात आता आम्‍हाला जायचे नाही. माझ्यापेक्षा महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांना विखे पाटील जास्‍त जवळून ओळखतात असे सुचक वक्‍तव्‍य करुन या निवडणूकीने आम्‍हाला बरेच काही शिकविले असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

देशाचा कना शिक्षक आहे, त्‍यांच्‍याप्रती सर्वांच्‍या मनात आदराची भावना आहे. शिक्षकांचे आशिर्वाद आम्‍हाला हवे आहेत. भविष्‍यातील पिढी घडविण्‍याचे काम शिक्षक करीत असतात. त्‍यामुळेच त्‍यांच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्‍याची भूमिका ही महायुती सरकारची आहे. शिक्षकांचा आत्‍मसन्‍मान कसा वाढेल हाच प्रयत्‍न महायुती सरकारचा असून, महायुतीचे उमेदवार आ.किशोर दराडे यांनी सभागृहात मांडलेले सर्व प्रश्‍न सोडविण्‍याचे काम राज्‍य सरकारने केले आहे.

नवीन पेन्‍शन योजनेचा शब्‍द सरकार पाळणार असून, २० टक्‍के, ४० टक्‍के अनुदान मिळणा-या शाळांच्‍या प्रश्‍नांबाबतही सरकार गंभिर आहे. आश्रमशाळांच्‍या वेळा बदलण्‍याबाबतही सरकार सकारात्‍मक असून, कंत्राटी शिक्षकांची वेतनवाढ, शिक्षण सेवकांचे मानधन आणि शिक्षकांच्‍या आरोग्‍य बिलाची समस्‍या कायमस्‍वरुपी सोडविण्‍यासाठी महायुती सरकारचे प्राधान्‍य असल्‍याचे आश्‍वासीत करुन, शिक्षण संस्‍थाही चांगल्‍या चालल्‍या पाहीजे. त्‍यांच्‍याकडून सुरु असलेल्‍या ज्ञानदानाच्‍या कार्याला सरकारचे पाठबळ असलेच पाहीजे हीच शासनाची भूमिका असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

राज्‍यात एैन निवडणूकीत कांदा आणि दूधाच्‍या भावाचे प्रश्‍न उपस्थित झाले. याचा अंडर करंट होता. दूधाला पाच रुपये अनुदान दिले. काही शेतक-यांना मिळाले, काहींना मिळाले नाही. परंतू आता दूधाच्‍या भावाबाबत तसेच कांदा आणि सोयाबिन उत्‍पादक शेतक-यांना दिलासा देण्‍याच्‍या दृष्‍टीने सरकार निर्णय करेल. राज्‍यातील महिला आणि युवकांच्‍या सक्षमीकरणासाठी सरकार निर्णय घेतच असून, यापुढेही या निर्णयात सरकार कुठेही कमी पडणार नाही.

डॉ.सुजय विखे पाटील यांचा उल्‍लेख करुन मुख्‍यमंत्री म्‍हणाले की, पराभव झाला असला तरी, खचून जायचे नाही. महाविकास आघाडीच्‍या खोट्या नॅरेटीव्‍हमुळे महाविकास आघाडीचा विजय झाला असला तरी, तो फारकाळ टिकणार नाही. पुन्‍हा एकदा आपण लढू आणि जिंकुन दाखवू. सत्‍य हे सत्‍यच असते. विखे पाटील परिवार रात्रंदिवस लोकांसाठी काम करीत आहे. सहकाराच्‍या माध्‍यमातून चौथी पिढी आज समाजासाठी कार्यरत आहे. या जिल्‍ह्याच्या प्रश्‍नांसाठी पालकमंत्री आणि मी सदैव तत्‍पर असून, जिल्‍ह्याच्‍या विकासात कुठेही कमी पडणार नाही असेही त्‍यांनी आश्‍वासित केले.

पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी आपल्‍या भाषणात जिल्‍ह्यातील विकासाच्‍या प्रश्‍नांना महायुती सरकार पाठबळ देत असून, भविष्‍यात तिर्थक्षेत्र पर्यटनासाठी नेवासे येथे संत ज्ञानेश्‍वर सृष्‍टी, अहिल्‍यानगरमध्‍ये स्‍टॅच्‍यु ऑफ युनिटीच्‍या धर्तीवर पुण्‍यश्लोक अहिल्‍यादेवींचे स्‍मारक आणि शिर्डी येथे साईबाबांच्‍या जीवनावरील थिमपार्क उभारण्‍यासाठी राज्‍य सरकारने अर्थसंकल्‍पातून निधी उपलब्‍ध करुन द्यावा अशा मागण्‍यांचे निवेदनं मुख्‍यमंत्र्यांना सादर केले. उमेदवार आ.किशोर दराडे यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले. प्रवरा परिवाराच्‍या वतीने मुख्‍यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांना श्रीकृष्‍णाची मुर्ती देवून सन्‍मानित करण्‍यात आले. तर उमेदवारी अर्ज मागे घेवून महायुतीला सहकार्य केल्‍याबद्दल कुलपती राजेंद्र विखे पाटील यांचा मुख्‍यमंत्र्यांनी सत्‍कार करुन आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 7 7 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे